विवाह सोहळ्यात केले जाणारे रीती-रिवाज हे का केले जातात?

     


     जे जे धार्मिक ते ते सगळे चांगलेच हे सिद्ध करण्यासाठी लोक काहीही सांगत सुटतात आणि त्याला शहाणे लोक सुद्धा बळी पडतात. त्यातून असे चुकीचे मेसेज व्हायरल होत असतात. विवाह विधी संदर्भातील अशाच एका मेसेजमधील फोलपणा उघड केला आहे चला उत्तर देऊया टीमने. मूळ पोस्ट व या पोस्टला दिलेले उत्तर प्रत्येक प्रश्नानंतर कंसात दिले आहे.


आपल्या हिंदु धर्माच्या शास्त्रानुसार विवाह सोहळ्यात केले जाणारे रीती रिवाज हे का केले जाते याची कारणे

१) लग्नात मांडव कशासाठी ???

= मातेनं माझ्या मुलीचं मनही मांडवासारखं मोठं आहे,हे सांगण्यासाठी !!!

*(हे कोणाला आणि का सांगावे लागते? आमच्या कंपनीची स्कूटर जास्त अॅव्हरेज देते असे सांगण्यासारखे हे नाही का?  मांडव नवर्‍यामुलाच्या घरी सुद्धा असतो तेव्हा त्याचेही मन मोठे असते हे सांगण्यासाठी का? दोघांची मने मोठी असतील तर ते सांगायची गरज का? पूर्वी लग्ने मुला-मुलींच्या बाल वयात होत असत. तेव्हा त्यांची मने विशाल आहेत हे कसे कळायचे?)*


२) विहिणबाईला आणि नवरदेवाला स्वागतास पायघड्या कशासाठी???

= माझ्या मुलीला तुम्ही असचं अलगद सांभाळा,हे सांगण्यासाठी !!!

*(सुनेला अलगद सांभाळण्यासाठी घरी आणले जाते का? आणि तिला तसेच अलगदपणे सांभाळले जाते का? पायघड्या घातल्या नाही म्हणून मुलीचा छळ होतो का, आणि घातल्या तरी छळ होणार नाही याची काय गॅरंटी?)* 


३) नवरदेवाची कानपिळी वधुच्या भावानेचं पिळायची,हे कशासाठी???

=माझ्या बहिणीला तुमच्या जीवनात नीट आणि चांगलं वागवा,हे सांगण्यासाठी !!!

*(आपल्या बायकोला नीट सांभाळावे एवढी अक्कल नवरदेवाला नसते का? कान पिळले जाऊन सुद्धा नवरदेव नीट वागत नसेल तर काय करायचं?)*


४) मुलीच्या मागं मामाच उभा राहतो,हे कशासाठी???

= मुलीला सांगण्यासाठी की मी तुझ्या आईच्या पाठीशी भक्कम उभा आहे,हे सांगण्यासाठी !!!

*(मुलीच्या आईच्या पाठीशी तिचा बाप भक्कम उभा नसतो का? मामाची गरज काय? मामाला स्वतःचा परिवार नसतो का?)*


५) लग्नात वधु-वरांनी एकमेकास जेवणाचा घास द्यायचा,हे कशासाठी???

= प्रेमाचं हे प्रतिक आहे। तुझ्या- माझ्यात काही अंतर राहिलेलं नाही,राहणार नाही व राहू नये हे सांगण्यासाठी !!!

*(वा, केवढा उदात्त विचार!!! नंतर 'पायातली वहाण पायातच बरी' या स्तरावर प्रेम घसरते.)* 


६) लग्नात सप्तपदी माहित आहे का कशासाठी???

= तुमच्या सुख-दु:खात मी आता सोबत आहे.सात पावलं हि केवळ मर्यादा आहे,हे सांगण्यासाठी!!!

*(बिचारीला सुखदुःखात सोबत राहणे भाग असते. इथूनच तिची अर्थी निघणार असते ना!)* 


७) लग्नात तांदळाची अक्षता उधळण कशासाठी???

= तांदूळ ची अक्षता याच्या साठी की तांदूळ चे बीज लावताना आपण एक जागी लावतो ते थोडे मोठे झाले की मग त्याची लावणी वेगळ्या जागी करतो तसेच मुलींचे बालपण माहेरी असते त्या जिथे मोठ्या होतात तिथून त्यांना दुसऱ्या जागी जावे लागते तिथेच त्यांचा वंश वाढतो याची आठवण रहावी म्हणून लग्नात तांदुळाच्या अक्षता टाकतात.

*(शुद्ध बकवास. मराठवाड्यातल्या मोठ्या भागात ज्वारी अक्षता म्हणून वापरतात त्याचे काय? ज्वारीची लागवड तर भातासारखी दुसर्‍यांदा होत नाही. काही ठिकाणी फुले वापरतात, काही ठिकाणी गहू वापरतात. त्याचे काय? दुसरी गोष्ट, या सगळ्याला धार्मिक आधार काय? हे विधी या हेतूनेच केले जातात असे कोणत्या धार्मिक ग्रंथात लिहिले आहे?)* 

*(तात्पर्य, प्रथा-परंपरा कोणत्याही कारणासाठी सुरू झाल्या असल्या तरी त्यात कालसुसंगत बदल व्हायला पाहिजेत.)*


 

टिप्पणी पोस्ट करा

नवीन टिप्पण्या अनुमत नाहीत.*

थोडे नवीन जरा जुने