शरद उपाध्ये यांचे अज्ञान

 ‘राशीचक्र’कार शरद उपाध्ये यांची एक फेसबूक पोस्ट व्हायरल होत आहे. त्या पोस्टला चला उत्तर देऊया टीमने दिलेले उत्तर  खाली देत आहोत.

शरद उपाध्ये


शरद उपाध्ये यांची पोस्ट पुढील प्रमाणे:  (२६ जुलै, २०२४: ०९.०५ वाजता) 

विज्ञानाची घोडदौड वाढू लागली की नास्तिकता फैलावण्याची शक्यता असते. मानवाचा अहंकार वाढू शकतो. सारे मीच निर्माण केले आहे. परमेश्वर वगैरे सा-या अंधश्रदा आहेत. याच कल्पनेने माणूस उन्मत्त होऊन पापकर्मे लीलया करू शकतो.

अशावेळी निसर्ग आपले रौद्ररूप दाखवून त्याला नमवतो. भन्नाट पाऊस कोसळू लागला की धडाधड इमारती पडू लागतात. आपल्या डोळ्यांसमोर माणसे, गुरे, वाहने वाहून जाऊ लागतात आणि आपण हताश होऊन पहाण्यापलिकडे काहीही करू शकत नाही. तेंव्हा माणसाला एका उच्च शक्तीची जाणीव अंतर्मुख करते. याचसाठी पूर्वापार निसर्गराजाची पूजा करण्याची पध्दत पडली आहे. जलदेवतेची पूजा तर आवर्जुन करायचे.निसर्गावर मात करण्याचा उध्दटपणा करण्यापेक्षा त्याच्या सहाय्याने पुढे जाणे यानेच सुरक्षितता वाढते हे ऋषीमुनींच्या लक्षात आले होते. बेसुमार जंगलतोड करुन सिमेंटची जंगले वाढवल्याने किती हानी होते हे आता पटू लागले आहे. विज्ञान हा मानवी बुध्दीचा श्रेष्ठ पैलू आहे पण निसर्ग हा माणसाचा आत्मा आहे.म्हणून सज्ञान मानवा,विज्ञान हे तुझे अज्ञान होऊ देऊ नको.  


या पोस्टला दिलेले उत्तर

मा. शरद उपाध्ये सर, 

आपल्या श्रद्धेच्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या  अधिकाराचा आदर राखून, आपल्या निदर्शनास हे आणून देऊ इच्छितो की आपण नास्तिकता आणि विज्ञानाविषयी फेसबुकवरील आपल्या पोस्टमध्ये मांडलेली मते एक तर या दोन्ही बाबींविषयी असलेल्या गैरसमजातून किंवा अज्ञानातून आलेली आहेत. 


विज्ञानाची घोडदौड वाढल्याने नास्तिकता (म्हणजे देव, ईश्वर, अल्ला, गॉड इत्यादि न मानण्याची वृत्ती) आणि मानवाचा अहंकार वाढू शकतो हा निष्कर्ष आपण नक्की कशाच्या आधारावर काढला आहे? देशात २०११च्या जनगणणेनुसार १२० कोटी लोकसंख्येत नास्तिकांची संख्या फक्त ३३००० होती (फक्त ०.००२७५ टक्के). मग नास्तिकता नक्की कुठे आणि किती वाढली?   


नास्तिकांना आपण अहंकारी, निसर्गावर मात करण्याचा उद्धटपणा करणारे वगैरे अप्रत्यक्षपणे संबोधता. नास्तिकतेच्या कल्पनेने माणूस उन्मत्त होऊन पापकर्मे लीलया करू शकतो असे आपण म्हणता आणि विध्वंसाचे खापर त्यांच्यावर (जे फक्त ०.००२७५ टक्के आहेत) फोडता.  

परंतु वास्तव मात्र पूर्णतः वेगळे आहे. 


नास्तिक, विवेकी लोक पर्यावरण, मानवी मूल्ये (समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, एकमेकांचा सन्मान) या बाबतीत संवेदनशील असतात आणि त्यासाठी ते आग्रही असतात.  होळीत मोठ्या प्रमाणात नाहक लाकडे जाळली जातात ते टाळून जंगले वाचवा, दिवाळीला-नाताळात-नववर्ष स्वागताला फटाक्यांमुळे होणारे वायू प्रदूषण टाळा, प्यायच्या पाण्याच्या स्रोतात गणपती विसर्जन टाळून जलप्रदूषण टाळा असा टाहो फोडत असताना देव मानणार्‍या  आस्तिकांच्या भावना दुखवतात. ते विवेकी लोकांवर हल्ले करतात. प्रसंगी गोळ्या घालतात.  मग निसर्ग नष्ट करू पाहणारे आस्तिक उद्धट, अहंकारी तसेच निसर्गाविरोधात पापकर्मे करणारे ठरत नाहीत का? 


नास्तिकांनी एखाद्या आस्तिकाचे मॉब लिंचिंग केल्याची, जातीय-धार्मिक दंगल घडवल्याची, मशि‍दीसमोर गोंगाट केल्याची, मंदिरात गायीचे मुंडके टाकल्याची उदाहरणे देखील सापडणार नाहीत. ते सारे आस्तिक लोकांचेच  काम असते ना? नास्तिकांना याची गरजच पडत नाही. कारण त्यांना योग्य-अयोग्य काय याचे विवेकभान असते. 


आधुनिक विज्ञान आपल्या वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये आणि अन्य ग्रंथांमध्ये हजारो वर्षांपूर्वी होते असे अभिमानाने सांगितले जाते. जर तुमचेच गृहीतक या काळाला लावायचे ठरले तर, तुम्ही हे मान्य कराल का की वेदांच्या  काळात देखील (विज्ञानाची घोडदौड चालू असताना)  नास्तिकता वाढू लागली होती? अहंकार वाढू लागला होता? 


तरी, नास्तिकांवर चिखलफेक करण्यापूर्वी आपण आस्तिकांना पर्यावरण संरक्षणच नव्हे तर समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य, मानवता यांचे धडे द्यावेत ही विनंती. बाकी, निसर्ग संवर्धन झाले पाहिजे या आपल्या मताशी सहमत. 


तर, मा. शरद उपाध्ये सर, तुम्ही नास्तिकता आणि विज्ञान या विषयी मते मांडताना चुकलात. तुम्ही असे काही लिहिले किंवा बोलले तर नास्तिकांच्या भावना दुखावणार नाहीत. पण ते तुम्हाला तुमची चूक मात्र नक्कीच दाखवून देतील. 

-चला उत्तर देऊया

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने